तुम्हा सर्वांना दिपावलीच्या अनेक-अनेक शुभेच्छा!! ही दिवाळी आपल्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समाधान, यश, भरभराट घेऊन येवो हिच मंगलमयी शुभेच्छा!!
दिवाळीनिमित्त एक छानशी गोड पाककृती घेऊन आलेय, चला तर साहित्य बघुया

साहित्यः
अर्धा लिटर दूध
४०-५० ग्राम खवा
दीड टेस्पून लिंबाचा रस
३/४ वाटी साखर
दीड वाट्या पाणी
१/२ टीस्पून वेलचीदाणे
पिवळा खाण्याचा रंग
गुलाबी खाण्याचा रंग
पत्रीखडीसाखर
२ टेस्पून पिठीसाखर
पिस्त्याचे काप सजावटीसाठी
एडिबल पर्ल्स सजावटीसाठी (ऐच्छिक)
पाकृ:
जाड बुडाच्या पातेल्या दूध उकळायला ठेवावे.
दूधाला उकळी आली की त्यात हळू-हळू लिंबाचा रस घालणे व सतत ढवळणे.
दूध फाटायला/फुटायला/नासायला लागले व त्याचे पाणी (व्हे) वेगळे होऊ लागले की त्यात बर्फाचे खडे टाकून गॅस बंद करावा.
बर्फ पूर्ण वितळला की दूध मलमल किंवा सूती कापड्यात ओतून, गाळून घेणे.
कापडाला घट्ट पिळून पनीरचे पाणी काढून टाकणे.
थंड पाण्याच्या नळाखाली पोटली धुवावी म्हणजे लिंबाचा वास जाईल.
१/२ तास पोटली टांगून ठेवावी म्हणजे जास्तीचे पाणी निघून जाईल.
१/२ तासानंतर पनीरला ताटात काढून चांगले ७-८ मिनिटे मळावे. पनीर अगदी मऊसूत झाले पाहिजे.
थोडे पनीर तळहातावर घेऊन चपटे करावे व त्यात पत्रीखडीसाखर ठेवून हलक्या हाताने वळा, एकही चीर नको.
(खडीसाखरचा वापर ऐच्छिक आहे, ती घातल्याने रसगुल्ले आतून पोकळ व हलके होतात तसेच पनीर चांगले मळले तरी ते हलके होतात)

पॅनमध्ये दीड वाट्या पाणी, वेलचीदाणे घालून उकळी काढावी.
उकळी आली की त्यात ३/४ साखर घाला व ढवळा.
साखर विरघळली की त्यात तयार केलेले पनीरचे गोळे सोडा व झाकण लावून १०-१५ मिनिटे शिजवा. रसगुल्ले शिजल्यावर आकाराने दुप्पट झाले पाहिजे.
रसगुल्ल्यांच्या बाऊल मध्ये खाण्याचा पिवळा रंग घालून, मिक्स करुन पूर्ण गार होऊ द्यावे.
(तुम्ही हे रसगुल्ले कुकरला ही शिजवून शकता, कुकरला २-३ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करुन नळाखाली कुकर धरायचा म्हणजे वाफ निघून जाईल)

एका ताटात खवा कुसकरून घ्यावा.
त्यात खाण्याचा गुलाबी रंग, पिठीसाखर व १/४ टीस्पून वेलचीपूड घालून चांगले मिक्स करावे. (पिठीसाखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यावे)
रसगुल्ले हलके दाबून पाक निथळून घ्यावे. त्यांचे दोन भाग करावे.
प्रत्येक अर्ध्या भागावर खव्याचे मिश्रण पसरावे.
वरुन पिस्त्याचे काप व एडिबल पर्ल्स लावावे.

गार करुन रसमाधुरी मिठाई सर्व्ह करावी.
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा __/\__
नोटः
* पनीर चांगले मळावे म्हणजे रसगुल्ले मऊसूत व लुसलूशीत होतात.
* खाण्याचा रंग आवडीप्रमाणे घालावे, नाही घातला तरी चालेल.
* खवा शक्यतो घरचाच व ताजाच असावा. (मिल्क पावडर घालून खवा बनवू नये चवीत फरक पडतो)
* पनीरमध्ये बाईंडिंगसाठी रवा, मैदा, कॉर्नफ्लार अजिबात मिसळू नये, रसगुल्ले गार झाल्यावर वातड होतात किंवा चवीत फरक पडतो.
* अर्धा लिटर दूधाच्या पनीरमध्ये मध्यम आकाराचे सहा रसगुल्ले तयार होतात.
* याप्रमाणेच खवा जरा परतून घ्यायचा व त्यात पिठीसाखर मिसळून घ्यायची. मिश्रण गार झाल्यावर खव्याच्या पारीत पाक निथळून घेतलेला रसगुल्ला स्टफ करुन गोळा वळायचा. हा गोळा ड्रायफ्रुट्सच्या पावडरमध्ये घोळवून घ्यायचा. रसकदम मिठाई तयार होते.
* एडिबल पर्ल्सऐवजी चांदीचा वर्ख ही लावू शकता.