
तिरामिसु हे एक सर्वांचे आवडते इटालियन डेझर्ट.. तिरामिसु चा अर्थ 'पिक मी अप' ..आणि खरंचच तिरामिसु पाहिले की त्याला पिक करायचा अनिवार मोह (वाढत्या वजनाची,साखरेची तमा न बाळगता )होतोच,
ह्या वेळी नेहमीच्या तिरामिसुत थोडा बदल केला आणि एक अफलातून तिरामिसु व्हर्जन जन्माला आले..

तर हे ऑरेंज तिरामिसु खास तुमच्यासाठी-
साहित्य-
अर्धी ते पाउण वाटी साखर, २ अंडी
१६ ते १८ लॉफेल बिस्किटे( तिरामिसु करताची स्पेशल बिस्किटे)
ही मिळाली नाहीत तर पार्ले जी बिस्किटे घ्या आणि साखर वाटीभर घ्या .लॉफेल बिस्किटात साखर असते त्यामुळे अर्धी वाटी साखर पुरते.
२५० ग्राम मस्कार्पोन चीज , ते नसेल तर लो फॅट क्वार्कचीज किवा फ्रेश क्रिम व्हिप करुन घ्या.
१/२ पेला ऑरेंज ज्यूस किवा रसना /टँग ऑरेंज सरबत बिस्किटे भिजवण्यासाठी.
ऑरेंज लिक्युअर किवा काँन्त्रु २ चमचे
टँग सरबताची पावडर २ चहाचे चमचे किवा ऑरेंज इसेन्स
ऑरेंज/मांडारिन टिन तो नसेल तर फ्रेश संत्री २/३
कॅरेमल सिरप सजावटीसाठी (ऑप्शनल)
एक चौकोनी ट्रे.
कृती-
टिनमधील संत्री चाळणीवर टाकून पाक निथळू द्या.
अंड्यातील पिवळे व पांढरे वेगळे करा व पांढरे हार्ड पिक्स येईपर्यंत बिट करा व बाजूला ठेवा.
अंड्यातील पिवळ्यात साखर घालून इतके फेटा की त्याचा ऑफ व्हाइट रंग होईल.
नंतर मस्कार्पोन चीज घालून फेटा.
निथळत ठेवलेल्या संत्र्यातील साधारण अर्धी वाटी संत्री व टँग पावडर त्यात घाला व फेटा.
सर्वात शेवटी अंड्यातील पांढरे (जे हार्ड पिक्स आणून बाजूला ठेवले आहे ते) घालून एकसारखे करा.
ऑरेंज ज्यूस मध्ये चमचाभर ऑरेंज लिक्युअर मिसळा.
लॉफेल बिस्किटे ट्रे मध्ये एकापुढे एक ठेवा, आणि त्यावर चमच्याने हळूहळू ऑरेंज ज्यूस घाला.बिस्किटे तो ज्यूस शोषून घेतील.
आता ह्या लेअर वर ऑरेंज+ मस्कारपोन चीजच्या मिश्रणाचा एक थर देऊन बिस्किटे झाकून टाका.
पुन्हा बिस्किटांचा एक थर लावा, ज्यूस घाला व त्यावर परत ऑरेंज+ मस्कारपोन चीजच्या मिश्रणाचा थर द्या.
बिस्किटे- क्रिम- बिस्किटे -क्रिम असे ४ किवा ६ थर एकावर एक येतील.
सर्वात वर मस्कारपोन चीजचा थर येऊ द्या.
फ्रिजमध्ये ६ ते ८ तास सेट करायला ठेवा. तिरामिसु थंड झाल्यावर घट्ट झालेले दिसेल.
टिनमधील संत्र्याच्या उरलेल्या फोडी + कॅरेमल सिरपने सजवा.(किवा तुमची कल्पनाशकी लढवून हवे तसे सजवा)