चीज न आवडणारा मनुष्य विरळाच.मीही याला अपवाद नाही. त्यामुळे चीज युक्त पिझ्झा, स्टफ्ड ब्रेड, गार्लीक ब्रेड हे असले प्रकार आवडते.
आज स्टफड चीज ब्रेड/कालझोन करायला घेतलाय.
साहित्य :
ब्रेडसाठी
दोन वाट्या मैदा.
१ चमचा साखर.
१ ते १.५ मोठा चमचा यीस्ट.
२ चमचे तेल.
चवी नुसार मीठ.
गरजे नुसार कोमट पाणी. (अंदाजे पाऊण वाटी.)
बारीक रवा (ब्रेड लाटताना.)
स्टफिंगसाठी
मॉझ्झरेला / चेडर चीज
कांद्याची पातं बारीक चिरलेली.
१ चमचा लसुण पावडर
१ चमचा बटर
चिली फ्लेक्स
एका अंड्यातला पांढरा भाग.
habanero peppers. ही अती जहाल असते.
त्यामुळे तिचा तिखटपणा कमी करण्यासाठी थोडं व्हिनेगर.
मिरचीच्या चकत्या करुन त्या व्हिनेगरमध्ये मुरत ठेवाव्या.
कृती :
खोलगट भांड्यात मैदा घेऊन त्यात यीस्ट, साखर, मीठ, १ चमचा तेल घालून मिश्रण हातानं एकत्र करून घ्यावं.
नंतर त्यात गरजे नुसार थोडं थोडं कोमट पाणी घालत पीठ मळुन घ्यावं. थोडं सैलसरच ठेवावं.
पीठ किमान १० मिनीटं तरी तिंबून घ्यावं. वरुन तेलाचा हात लावून भांडं उबदार कोपर्यात किंवा (फक्त दिवा पेटतो त्या तापमानाला) ओव्हनमध्ये ३०-४० मिनीटं ठेवावं. तेवढ्या वेळात ते किमान दुप्पट फुलून येईल.
फुलून आलेलं पीठ हलक्या हाताने मळुन घ्यावं. फार जोर लावू नये.
थोडा रवा पसरवून त्यावर पीठाचा गोळा ठेऊन त्याची जरा जाडसर पोळी लाटुन घ्यावी. (अंदाजे ३/४ सेमी जाड.)
आंड्यातला पांढरा भाग आणि बटर एकत्र फेटुन घ्यावं. लाटलेल्या पोळीवर ते मिश्रण ब्रशने लावावं.
अर्ध्या भागात मॉझ्झरेला चीज पसरवावं. त्यावर मिरचीच्या फोडी रचाव्यात. कांद्याची पातं. तिखट आवडत असल्यास चिली फ्लेक्स टाकावे.
सामिष आवडणार्यांनी चिकनचे शिजवलेले तुकडे वा मी वापरलय तसं सॉसेजेसच्या चकत्या वापरायला हरकत नाही.
शाकाहारी मंडळींनी परतेलेले मश्रूम वापरले तरी चालेल.
वरुन परत चीज पसरवावं.
पोळीचा वरचा भाग दुमडून करंजी सारखा आकार द्यावा, आणि कडा हाताने दाबून सिलबंद करुन घ्याव्या.
पिझ्झा कटरने वा सुरीने उभे काप द्यावे. आणि वरुन परत अंड्+बटरच्या मिश्रणाचा ब्रश फिरवावा.
एकीकडे ही तयारी चालू असतानाच ओव्हन १८०°C वर १० मिनिटं प्रीहिट करुन घ्यावा.
वरून थोडी कांद्याची पातं, लसणाची पावडर भुरभुरावी. आणि मग ती संपुर्ण आरास बटर पेपरला किंचीत बटर लावून बेकिंग ट्रेवर ठेऊन, ट्रे ओव्हनमध्ये सारावा.
साधारण २५ ते ३० मिनीटांनी ब्रेड तयार होईल. (मधे-मधे लक्ष ठेवावं.) वरुन थोडंस चीज भुरभुरावं आणि ओव्हन बंद करुन ब्रेड त्यात ५ मिनीटं ठेवावा.
हा पदार्थ थंड झाल्यावर तेवढी लज्जत रहात नाही. तेव्हा ओव्हन मधुन बाहेर आल्या आल्याच त्यावर तुटुन पडावं.