शीषर्कावरुन आरोळि/हाक ओळखीची वाटतेय का? मग दाहक उन्हाळा आणि थंडगार कुल्फि ह्यांच नातं आहेच तस घट्ट. आंब्याचा ऋतु असल्यामुळे आंबा घालुन कुल्फि तर केलीच पण ती सेट सुद्धा जssssरा वेगळ्या पद्धतीने सेट केली. कसं??? चला सांगतो बरं...
साहित्यः
१. तयार घट्ट आंबे - २
२. मिल्क पावडर - २ कप
३. काजु पावडर - १ कप
४. पिस्ता पावडर - १/२ कप
५. साखर - चवीप्रमाणे कमी/जास्त
६. आंब्याचा पल्प/रस - २ कप
७. कार्निशन ईव्हॅपोरेटेड मिल्क - १ टिन
८. नेस्ले फुल क्रिम - १ टिन
९. चिमुटभर केशर - कोमट दुधात घालुन ठेवणे
१०. सजावटिसाठि बदाम-पिस्त्याचे काप
कृती:
१. तयार आंब्याचं वरचं साल थोडं कापुन घ्या. आता सुरी चारहि बाजुन हळुवारपणे खुपसुन जागा करा. हलक्या हाताने आंबा पिळत आतील बाठ काढुन टाका......हाकानाका. सुरवातीला पहिला आंबा पोकळ करताना जरा जड गेलं पण हे दिसतं तेवढं कठिण नाहि पण त्यासाठि तयार आंबा कडक घ्या.
२. आता एका मोठया बाउल/भांड्या मधे अनुक्रमे मिल्क पावडर, काजु / पिस्ता पावडर, साखर, केशरमिश्रित दुध, आंब्याचा पल्प, ईव्हॅपोरेटेड मिल्क आणि नेस्ले फुल क्रिम घालुन हलक्या हाताने मिक्स करा.
३. तयार कुफ्लिचं मिश्रण पोकळ आंब्यात भरुन डिप फ्रिजर मधे सेट करण्यास ठेवा. उरलेलं मिश्रण आवडत्या मोल्ड/साच्यात घालुन मँगो कुल्फि सेट होण्यास ठेवा.
४. कुल्फि सेट झाली कि फ्रोझन आंबे सुरीने / सोलाण्याने सोलुन घ्या. आंबे प्रचंड गार झाल्यामुळे सालं काढताना हात बधीर होतात. तेव्हा सोलताना टिश्यु पेपेर किंवा किचन टॉवेल घ्या. त्यातहि सुरीपेक्षा सोलाणं घ्या. आंबे कडक झाल्यामुळे सोलाण्याने सालं लवकर निघतात.
५. हव्या त्या आकारात कापुन (शक्यतो गोल) व वरुन बदाम/पिस्त्याचे काप घालुन ईनोव्हेटिव्ह कुल्फि पेश करा/ घरच्यांबरोबर लुफ्त घ्या.
टिपा:
१. कुल्फि नुसती आंब्यात सेट करायची झाल्यास साहित्याचं प्रमाण त्यानुसार ठरवा.
२. कुल्फि मिश्रणात जर बारीक चीरलेल्या चेरीज घातल्यात तर कलर कॉम्बीनेशनच्या दृष्टिने फायनल प्रॉडक्ट अधीक आकर्षक दिसेल.
३. कुल्फिचे गोल काप अश्यासाठि कि,
अ. कुल्फि भोवती आंब्याचं रिंगण फार मोहक वाटतं आणि
ब. पहिला घास घेताना आधी आंब्याची चव तोंडात येउन मग कुल्फिची येते अर्थात हे आपलं माझं मत झालं. तुम्हाला आवडतील तसे काप करा. पण आंबा गोडच बघा जरा जरी आंबट असला तरी पुढिल चव बिघडेल.