साहित्यः
१ किलो चिकन साफ करुन, किंचित हळद, तिखट, लिंबू रस लावून मॅरिनेट करुन ठेवणे
१ मोठा कांदा बारीक चिरलेला
२ टेस्पून आले+लसूण पेस्ट
३ टेस्पून सावजी मसाला ( आवडीप्रमाणे कमी जास्तं)
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर
सावजी मसाला साहित्यः
सावजी चिकन/ मटण हे झणझणीत, जहाल तिखट असते. मी तिखटाचे प्रमाण थोडे कमी, आमच्या चवीप्रमाणे बसवले आहे. तुम्ही आवडीप्रमाणे कमी - जास्तं, तब्येतीला झेपेल असे प्रमाण बसवावे

३ टेस्पून सुके खोबरे
३ टेस्पून ज्वारीचे पीठ
६-७ लाल सुक्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी - जास्तं)
१/२ टीस्पून धणे
१/२ टीस्पून बडीशेप
१/२ टीस्पून शहाजिरे
१/२ टीस्पून पेक्षा थोडी जास्तं टीस्पून खसखस
४ हिरवी वेलची
२ मसला वेलची
थोडे दगडफूल
४-५ लवंगा
९-१० काळीमिरी
१ जायपत्री
२-३ दालचिनीच्या काड्या तोडून
पाकृ:
एका पॅनमध्ये धणे, बडीशेप, शहाजिरे, खसखस, हिरवी वेलची, मसला वेलची, दगडफूल, लवंगा, काळीमिरी, जायपत्री व दालचिनी कोरडेच मंद आचेवर भाजायला घ्या.
थोडे लालसर झाल्यावर त्यात सुके खोबरे व लाल सुक्या मिरच्या घालून भाजून घ्या.
शेवटी ज्वारीचे पीठ घालून मंद आचेवर थोडे लालसर भाजून घ्या.
गार झाले कि कोरडेच मिक्सरवर वाटून घ्या.

एका भांड्यात तेल गरम करुन आले+लसूण पेस्ट परतवून घ्या.
त्यात बारीक चिरलेला कांदा घालून थोडा गुलाबी रंगावर परतवून घ्या.
त्यात सावजी मसला, मीठ व मॅरिनेट केलेले चिकन घालून चांगले परता.
गरजेनुसार पाणी घाला व झाकून चिकन शिजू द्या.
ज्वारीच्या पिठामुळे रस्सा दाट होतो, त्याप्रमाणे पाणी घाला.
चिकन शिजले की वरुन बारीक चिरलेली कोथींबीर पेरावी.

काही जणं सावजी चिकनमध्ये वरुन दोन चमचे खोबरेल तेल सोडतात, मी तसे न करता दोन चमचे तेलात (रोजच्या वापरातले तेल) सावजी मसाल्याची फोडणी देऊन ती फोडणी चिकनवर ओतली त्यामुळे छान तरी आली.
गरमा-गरम सावजी चिकन खाण्यासाठी तयार आहे
