आमच्या त्सेंटा आजीची एक मैत्रिण आहे, बिर्गिटं तिचे नाव.. भयंकर उत्साही! सत्तरीच्या पुढची ही तरुणी, अजूनही कुठेकुठे पाककलास्पर्धां मध्ये भाग घेऊन जिंकत असते.. मागच्याच महिन्यात भेटली तेव्हा तिने शेअर केलेली ही केकृ-
साहित्य-
२५० ग्राम बटर/मार्गारिन
२०० ग्राम साखर
४ अंडी
२०० ग्राम मैदा + १०० ग्राम स्पाइझंस्टेर्क (कॉर्नस्टार्च)
३ टीस्पून बेकिंग पावडर
१.५ टीस्पून वॅनिला इसेन्स /१ पाकिट वॅनिलाशुगर
१ टीस्पून किसलेली लिंबाची साल
४ टेबलस्पून कोको पावडर (डार्क)
१ टीस्पून रम/रम इसेन्स (ऑप्शनल)
साधारण कपभर दूध
चिमूटभर मीठ
कृती-
बटर भरपूर फेटणे, साखर घालून फेटणे.
त्यात एक एक अंडे घालून फेटणे.
वॅनिला अर्क व लिंबाची किसलेली साल घालून फेटणे.
मैदा+ स्पाइझंस्टेर्क(कॉर्नस्टार्च) एकत्र करणे, त्यात बेकिंगपावडर व चिमूटभर मीठ घालणे.
मैदा+ स्पाइझंस्टेर्क(कॉर्नस्टार्च) २-३ टेबलस्पून व एखादा टीस्पून दूध असे वरील मिश्रणात घालत फेटत रहाणे.
सर्व मैदा नीट एकत्र झाला की परत एकदा चांगले फेटून घेणे.
अवन १८० अंश से. वर प्रिहिट करणे.
केक मोल्डला ग्रिझिंग करुन घेणे.
वरील केकच्या मिश्रणातील अर्ध्याहून थोडा जास्त भाग केक मोल्डमध्ये ओतणे व उरलेला भाग बाजूला ठेवणे.
२-३ टेबलस्पून दूध कोमट करणे ,त्यात कोको पावडर मिसळणे व मिश्रणाच्या उरलेल्या भागात हे ओतणे.
हवे असल्यास रम/रम इसेन्स घालणे. चांगले मिक्स करणे.
हा कोकोयुक्त भाग केकमोल्डमध्ये ओतणे.
एक काटा (फोर्क) घेऊन कोकोचे मिश्रण व वॅनिलाचे मिश्रण वरखाली करणे.
असे केल्याने मार्बल इफेक्ट येईल.
फोर्कने मिश्रण वरखाली करण्याची भीती वाटत असेल तर सरळ दोन्ही मिश्रणे २-३ चमचे अशी एकेक करुन केक मोल्डमध्ये घाला. नंतर मोल्ड हलवून मिश्रण एकसारखे करा. त्यानेही मार्बल इफेक्ट येईल.
१८० अंश से वर साधारण ५०-५५ मिनिटे बेक करणे.
नेहमीसारखेच केक झाला की नाही ते (त्याच्या) पोटात सुरी/ विणायची सुई खुपसून पाहणे.
केक झाला तरी ५-६ मिनिटे अवन मध्येच राहू देणे.
साधारण कोमट झाला की मोल्ड मधून जाळीवर काढणे, व गार झाला की कापणे.
कॉफीबरोबर आस्वाद घेणे.

