साहित्य पंचखाद्यः
१ वाटी सुके खोबरे
१ टेस्पून खसखस
१/२ वाटी खडीसाखर
१ टेस्पून बेदाणे (किसमिस)
१ टेस्पून खजूर बारीक तुकडे करुन
१/२ टीस्पून वेलचीपूड
पंचखाद्यात खारकेचा वापर करतात पण मला इथे खारीक मिळत नसल्यामुळे मी खजूर वापरला आहे. तुम्ही खारीक घेऊ शकता, फक्त त्याची पूड करून घ्यावी.
पाकृ:
एका पॅनमध्ये सुक्या खोबर्याला मंद आचेवर हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यावे.
बाजूला काढून ठेवावे व त्याच पॅनमध्ये खसखस हलकी भाजून घ्यावी.
खडीसाखरेला खल-बत्त्यात थोडे कुटून घ्यावे.
सुके खोबरे, खसखस गार झाले की एकत्र करावे, त्यात कुटलेली खडीसाखर मिसळून मिक्सरला बारीक फिरवून घ्यावे.
ह्या मिश्रणात आता बेदाणे, खजूरचे तुकडे व वेलचीपूड घालून एकत्र करावे.

साहित्य मोदक आवरणः
१ वाटी मैदा
१/२ वाटी रवा
दूध मैदा भिजवण्यापुरते
१/४ टीस्पून मीठ
३ टेस्पून तेलाचे मोहन
पाकृ:
एका भांड्यात रवा, मैदा व मीठ एकत्र करावे.
त्यात कडकडित मोहन घालावे.
चांगले मिक्स करावे, थोडे थोडे दुध घालून घट्ट पिठ मळून घ्यावे.
तासभर झाकून ठेवावे.
तासाभराने पिठ पुन्हा एकदा मळून घ्यावे व त्याचे छोटे-छोटे गोळे करावे.

पंचखाद्याचे - खिरापतीचे तळणीचे मोदकः
गोळ्याची छोटी पारी लाटून मुखर्या पाडून घ्याव्यात.
त्यात चमचाभर सारण भरून, हलक्या हाताने मोदकाचे तोंड बंद करावे.
अश्या प्रकार सर्व मोदक बनवून घ्यावे.
कढईत तेल तापत ठेवावे, आच मंद असावी.
एक-एक करुन तयार मोदक त्यात सोडावे व मंद आचेवर सोनेरी रंगावर तळावेत.
छान खुसखुशीत होतात मोदक.

पंचखाद्याचे - खिरापतीचे मोदक गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून सर्वांना द्यावे

गणपती बाप्पा मोरया !! __/\__