साहित्य :
फणसाच्या आठ्या सोललेल्या.
सोडे, गरम-कोमट पाण्यात १५-२० मिनीटे भिजवलेले.
प्रत्येकी २ मध्यम आकाराचे कांदे, बटाटे, टॉमेटो, वांगी.
आवडत असल्यास भिजवलेले वाल (सालां सकट.)
२ मोठे चमचे तेल, १ लहान चमचा हळद, ३ मोठे चमचे मसाला, मीठ चवी नुसार.
चिंचेचा कोळ. १-२ चमचे आलं-लसुण वाटण.
२-३ मोठे चमचे तांदळाची पीठी.
कृती :
आठ्या हलकेच ठेचुन, एका शिट्टिवर उकडुन घ्याव्या.
तेलावर कांदा परतुन घ्यावा. गुलाबी झाला की त्यात आलं लसुण वाटण, हळद, मसाला, किंचीत मीठ टाकून, मसाल्याचा खमंग वास दरवळे पर्यंत परतत रहावं.
मसाला तेल सोडू लागला की त्यात वाल आणि बटाटे टाकुन परतावं. थोडं पाणी टाकून भांड्यावर झाकण ठेऊन मध्यम आचेवर बटाटे आणि वाल शिजू द्यावे.
वाल शिजले की मग वांगी आणि टॉमेटो टाकावे. वांगी अर्धवट शिजली की मग भिजवलेले सोडे आणि उकडलेल्या आठ्या टाकाव्या. आच लहान करुन वांगी शिजू द्यावी. वांगी शिजली की मग चिंचेचा कोळ टाकून एक उकळी आणावी. चवी नुसार मीठ घालावं.
तांदळाची पीठी अर्ध्यावाटी पाण्यात मिसळुन टाकावी. परत एक उकळी आणावी आणि आचं बंद करावी.
याच्या जोडीला मसाला फ्राय सुके बोंबील हे हवेच
तांदळाच्या भाकरी सोबत वा भाता बरोबर गरमागरम ओरपावे.